रविवार, २० नोव्हेंबर, २०११

आगर बोली

दर्यावरचा कोळी, आगरातला आगरकर-आगरी, माळातला माळी आणि रानातला आदिवासी अशा भौगोलिकदृष्ट्या कोकणातल्या आगरातील वसाहती. आगर म्हणजे भात, मीठ, नारळ, सुपारी, भाजीपाला, फळे व मासे संवर्धन करण्याची जागा. असे आगर पिकविणारा तो आगरकर-आगरी. ह्या आगरी समाजाची वस्ती रायगड (पूर्वीचा कुलाबा), ठाणे ह्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. कोकण सोडून धुळे, जळगाव-पासून गुजरातपर्यंत ती तुरळक प्रमाणात आहे. ह्या समाजाची बोली ती आगरी बोली असे ह्या बोलीचे नामकरण करता येईल; परंतु आगरी ही एक जात समजली जाते; तेव्हा अशी जातीची बोली-आगरी बोली म्हणणे संकुचितपणाचे आहे. शिवाय ही बोली हाच समाज बोलतो असे नाही, तर आगरातील बलुतेदार, आदिवासी यांच्याबरोबर दुकानदार-मारवाडीही प्रसंगपरत्वे ही बोली बोलतात. शिवाय कोळी, माळी हे समाज जवळ असल्याने त्या बोलींची मिश्रता ह्या बोलीत आहे. तेव्हा सर्वसमावेशक दृष्ट्या ह्या बोलीस आगरातील बोली - ‘आगर बोली' म्हणजे सयुक्तिक वाटते.
ही आगर बोली समुद्राकाठची असल्याने हीत उच्‍चार-स्पष्टता हवी तशी नाही. विरार-वसईकडे ही बरीचशी सानुनासिक आहे. तर अलिबागकडे तशी स्पष्ट आहे. ही बोली जवळजवळ प्रत्येक गावानुसार थोडीशी बदलते. मुंबईतील हा मूळ समाज ही बोली विसरला आहे, तर नवी मुंबईतील ही बोली कोळी बोली मिश्रित अशी आहे. वसई-पालघरकडे ही बोली वाडवळ, भंडारी बोली मिश्रित अशी येते.
आगरी समाजाचे पूर्वी (१) शुद्ध आगरी, (२) दस आगरी व (३) वरप आगरी असे पोटजातीत वर्गीकरण होत होते. शुद्ध आगरीत मीठ आगरी, जस आगरी व ढोल आगरी असे उपपोट प्रकार होते. आज मात्र असे प्रकार मानले जात नाहीत. खुद्द मुंबाआईच्या मुंबईत चौदा पाटील, बारा पाटील, आगळे आगरी असे स्तर मानले जात; तेही आता मानले जात नाहीत.
आगर बोलीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ‘ळ'च्या ऐवजी ‘ल' व ‘ण'च्या ऐवजी ‘न' जसे सकाळ-सकाल, पळव-पलव; कोण-कोन, बाण-बान, वळण-वलन.
ह्या बोलीची रूपे व काही शब्द महानुभाव पंथीय व भागवतधर्मीय ग्रंथलेखनात दिसून येतात. विशेषत: लीळाचरित्र, दृष्टांतपाठ व ज्ञानेश्वरीत ते जास्त प्रमाणात दिसतात. आगरात लोकगीते व लोककथा यांचा भरणा जास्त आहे. ही लोकसंपदा म्हातार्‍या आजीकडून - डोकर्‍यांकडून ऐकायला कर्णमधुर वाटते.
गाय बा चर्‍हतं भीमा तीरी गो,
भीमा तीऽऽरी
गायला राखीत किस्‍न हरी गो,
किस्‍न हऽऽरी
काय बा वर्नू गायची शेपू गो,
गायची शेऽऽपू,
जशी नांगीन घेतं झेपू गो,
नांगीन घेतं झेऽऽपूू
काय बा वर्नू गायच्या मांड्या गो,
गायच्या मांऽऽड्या
जशी पालुखीच्या दांड्या गो
पालुखीच्या दांऽऽड्या -
इथे तेराव्या शतकातील प्राकृत बोलीतील शेपू, नाकू, कानू अशी रूपे साकारलेली दिसतात.
आगर बोलीत लोककथा अमाप आहेत. ह्या लोककथा सांगताना अलिबागच्या आगरात नेहमी गोष्टींच्या ओनाम्याला येते ती तीन भांवडांची गोष्ट-
अकामकची गोष्ट
यक व्हता अका, यक व्हता मका. आन त्या दोघांची यक बह्यनीस व्हती हिजू. त अका, मका आन हिजू गेली खारीन, झोलाला. अकला मिलला निवटा, मकला मिलला खरबा आन हिजूला मिलली कोलबी. तिघाजना आली घरा. अकनी निवटा टाकला चुलीन भुजत, मकनी खरबा आन हिजूनी कोलबी टाकली भुजत. न तिघाजना गेली नदीवर आंग धवला. तिघाजना आंग धऊनशी आली, त हिजूची कोलबी करापली! मंग अकनी दिला डोचूक, मकनी दिला शेपूट आन हिजूचा जवान केला चालता. अशी तिघाजना जवली.
(यक-एक, व्हता-होता, खारीन-खाडीत, झोलाला-मासे पकडायला, निवटा (खरबा, कोलबी) - मासळीचे प्रकार, चुलीन-चुलीत, भुजत-भाजत, आंग धवाला- आंघोळीला, करापली - करपली, डोचूक - डोके, जवान - जेवण.)१
कावला - चिरीची गोष्ट
यकदा कावला आन चिरीनी केली भागीन भातशेती. यलवर पाऊस परला, आगोठ लागली. कावलनी धरला नांगर, चिरीनी केली भातपहिरनी. यलवर लावनी केली. चांगला पाऊस झाला. मस्त मशागत केली. जाम पीक आला. दोघाही मिलून लानी केली, भांदनी केली. मातर कावलनी यकटनीच मलनी कार्‍हली आन भाताच्या भरल्या बारीक गोनी, पलजीच्या भरल्या म्होट्या म्होट्या गोनी. आन चिरीला बोलला, ‘चिरबाय, तुल्हा या म्होट्या गोनी घे, मना बारक्या गोनी दे.' चिरीनी गोनी हालवून बघितल्या. ती कावलचा कावा समाजली. ती बोलली, ‘कावलंदादा, माझा बारका जीव मना बारक्या गोनी दे, तू म्होटा तुला म्होट्या गोनी घे.' पन कावला काय ऐकना. शेवटी परकरन गेला न्यायाधीसाकरं. त्यांनी केला न्याय आन चिरीला तिचा हिस्सा-वाटा मिलवून दिला. चिरी बोलली, ‘कावलंदादा, तुझी आथा वाट यगली. तू तुझे वाटन जा, मी माझे वाटन.'
दृष्टांतपाठात शोभाव्या अशा कितीतरी लोककथा आगर बोलीत आहेत. अशी बोली ऐकताना ह्या बोलीची काही वैशिष्ट्ये नोंदता येतील -
(१) ‘ळ'बद्दल ‘ल' : कंटाळा-कंटाला, नळ-नल, धूळ-धूल.
(२) ‘ण'बद्दल ‘न' : आठवण-आठवन, पण-पन, गोण-गोन.
(३) शद्बारंभी येणारा ‘ड' तसाच राहतो मात्र नंतरच्या ‘ड' चा ‘र' होतो :
डबा-डबा, डसा; कडू-करू, वेडा-यरा, तडांग-तरांग.
(४) शब्दान्ती येणारा ओकार ऊकार होतो : गेलो-गेलू, आलो-आलू.
(५) ओकारान्त शब्द अकारान्त होऊन पुढे ‘स' येतो : घेतो-घेतस,
मारतो - मारतस, करतस, जातस इ०
(६) शब्दान्ती ‘त' ऐवजी ‘व' येतो : घेतलात-घेतलाव, बघितलेत-बघितलाव,
केलाव, तोरलाव इ०
(७) शब्दान्ती ‘ए'चा दीर्घ ‘अ' होतो. : कुठे-कुठं, तिथे-तिथं, इथं.
(८) अनेकवचनी नामाच्या अन्ती ‘ए'चा ‘आ' होतो : झाडे-झारा, पोरे-पोरा,
लाकडा शेता.
(९) अनुस्वार स्पष्ट उच्‍चारला जात नाही : आंबा-आऽबा, चिंच-चिऽच, रंग-रऽग,
हंडा-हाऽडा, पिंपळ-पिपल, खुंट-खूट.
(१०) छ चा सर्रास स होतो : छत्री-सत्री, छोटा-सोटा, छोकरा-सोकरा,
छगन-सगन, छडी-सरी.
(११) शब्दान्ती कठोर व्यंजन येऊन तत्पूर्वी व आला तर व चा अर्धा व होऊन
त्यापुढे महाप्राण येऊन अन्तीच्या कठोर व्यंजनाचा र होतो : केवढा-कव्हरा, तेवढा-त्यव्हरा, जेवढा-जव्हरा.
(१२) शब्दारंभी र चा कधी ल होतो : रडतोय-लरतय, रबर-लबर,
(१३) संयुक्त व्यंजनातील र वेगळा उच्‍चारला जातो : प्रकाश-परकास, मात्र-मातर,
कात्री-कातर, श्रीमंत-शीरीमंत.
(१४) श चा स होतो : शरद-सरद, शाप-सराप, शोध-सोद.
(१५) शब्दारंभीचा वि जाऊन त्याजागी इ येतो : विमान-इमान, विमल-इमल,
विषय-इषय, विरजण-इरजन.
(१६) पण (सुद्धा या अर्थी) ऐवजी पन किंवा बी येते : मीपण-मीपन/बी,
तू पण-तूपन/बी
(१७) ऊन, हून प्रत्ययाऐवजी शी येतो : गर्दीतून-गर्दीशी, गावातून-गावानशी,
लांबून-लांबशी, गावाहून-गावशी.
(१८) ‘ला' या प्रत्ययाऐवजी ल्हा येतो : तुला-तुल्हा, तिला-तिल्हा. मात्र मलाचे
मना होते.
(१९) ‘त' या प्रत्ययाऐवजी न येतो : फुलात-फुलान, रानात-रानान, मनात-मनान.
(२०) नो (संबोधन) ऐवजी नू किंवा हू येतो : पोरांनो-पोरांनू/पोरांहू.
गाववाल्यांनो - गाववाल्यांनू/हू.
(२१) ‘प्रमाणे' ऐवजी सारा/सारी येते : त्याप्रमाणे-त्या सारा/री,
मुलाप्रमाणे-मुलासारा, साखरेप्रमाणे-साकरंसारा.
(२२) ‘होता', ‘नव्हता' ऐवजी ‘व्हता', ‘नता' येते.
(२३) ‘आता'चे ‘आथा' होते : आथा कल्हा लरतस?
(२४) ‘अ'चा सर्रास ‘आ' होतो : अंग-आंऽग, अंतर-आंतर, असा-आसा.
(२५) कशालाचे कन्हाला किंवा कल्हा होते - कन्हाला आलास?
(२६) शब्दारंभी ‘वे' ऐवजी ‘य' येतो : वेडा-यरा, वेस-यस, वेगळा-यगला,
वेद-यद, वेसण-यसन.
(२७) शब्दारंभी ‘म'ऐवजी ‘म्हा' येतो : महादेव-म्हादेव, मोठा-म्होटा,
मारुती-म्हारोती, महाराज-म्हाराज.
(२८) ‘ढ' ऐवजी ‘र्‍ह' येतो : गाढव-गार्‍हव, पेढा-पेर्‍हा, कढी-कऱ्ही.
(२९) शब्दारंभी ‘ओ' ऐवजी ‘व' येतो : ओटा-वटा, ओवा-ववा, ओकारी-वकारी,
ओल-वल.
(३०) शब्दारंभी ‘ए' ऐवजी ‘य' येतो : एक-यक, एकदा-यकदा, एकर-यकर.
(३१) शब्दान्ती ई ऐवजी य येतो : सुई-सुय, रुखमाई-रुखमाय, आई-आय,
घाई-घाय, जावई-जावय.
(३२) शब्दारंभी व्यंजन+ऐ च्या ऐवजी व्यंजन+अ आणि नंतर लगेच ‘ई' असा
बदल होतो : बैल-बईल, म्हैस-म्हईस, वैद्य-वईद, मैल-मईल, खैर-खईर, सैल-सईल,
(३३) शब्दारंभी व्यंजन+औ च्या ऐवजी व्यंजन+अ आणि नंतर लगेच ‘ऊ' असा
बदल होतो : मौज-मऊज, गौर-गऊर, फौज-फऊज, हौद-हऊद, कौल-कऊल,
अशी ही उत्तर कोकणची आगर बोली मराठी सारस्वतात लेखनात न आल्याने फारशी रुळली नाही. पण तशी ही समजण्यास कठीण मात्र नाही. माझ्या कथा, कादंबरी व ललित लेखनातून ही प्रथमच मोठ्या प्रमाणात आली आहे. बरोबरच आदिवासी - कातकरी, कोळी, माळी, कोकणी मुसलमानी, याही कोकणी बोली माझ्या अनेक पुस्तकांतून आल्या आहेत. जिज्ञासूंनी ‘एसईझेड', ‘घरपरसू', ‘गावदरणी', ‘कोसलन', ‘आगरातली माणसं', ‘बलुतेदार', ‘शब्दानुबंध' वगैरे पुस्तके पाहिली तर ह्या बोलींचा परिचय होईल.
‘तुलसी निवास', ए-२०२, विजया बॅंकेजवळ, सेक्टर १९, कोपरखैरणे, नवी मुंबई ४००७०९.
दूरभाष : (९५२२) २७५४५५३१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा