रविवार, २० नोव्हेंबर, २०११

आगरी जातीचा इतिहास ......

आगरात राहणारे ते आगरी होय. आगर मग ते भात पिकणारे खाचर असेल किंवा समुद्र किनारी मीठ तयार होणारे मिठागर असेल! भातासोबत मिठाचे उत्पादन करणारे श्रमिक म्हणजे आगरी होय. आगरी माणूस तसा मांसाहारी, त्याला मच्छी अधिक प्रिय म्हणून तो खाडीमध्ये अथवा समुद्रात जाऊन मच्छी पकडणारच. जेवणामध्ये त्याला ताजी मासळी लागते. म्हणून या आगरी माणसाने पुढे पुढे भातशेतीसोबतच मत्स्यशेतीचाही व्यवसाय सुरु केला. आपल्या घराजवळ आपल्याच शेतामध्ये तलाव खोदून त्या तलावात मत्स्यबीज सोडून मासळीची पैदास अनेक वर्षे आगरी माणूस करीत आहे. अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड या गावातील आगरी माणसे व त्यांनी निर्माण केलेले छोटे-मोठे तलाव याबाबत एक मोठे आदर्श उदाहरण घेता येईल. मत्स्यशेतीमुळे उपजीविकेचे साधन निर्माण होते. अनेक गरजांची पूर्ती होते. मत्स्यशेती हा प्रकल्प शासनाने आगरी माणसापासूनच घेतलाय, हे कुणालाही नाकारता येणार नाही.
मुंगी पैठणहून आगरी माणूस कोकणात आला. कुणी म्हणतात आग्रा-दिल्लीकडून आगरी माणूस इथे आला. दक्षिणेकडे श्रीलंकेत रावणाच्या दरबारात आगरी माणूस ढोल-ताशा वाजवायचा, म्हणजेच तत्कालीन संगीतकाराचे काम करायचा. अशा अनेक आख्यायिका आगरी माणसाबद्दल ऐकायला मिळतात. तरीही सांगावेसे वाटते- आगरी माणसाची संस्कृती, त्याच्या परंपरा, त्याचा लढाऊ बाणा, त्याची कलात्मकता सारे काही इथल्याच मातीशी नाते सांगणारे आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते- ठाणे, मुंबई व रायगड या तीन मुख्य विभागात वस्ती करुन राहिलेला आगरी माणूस हा इथला भूमीपुत्र होय. बहुधा आगरी माणूस हा इथलाच मूळ निवासी असावा व इथूनच तो श्रीलंका, आग्रा, मुंगी पैठण, नाशिक अशा ठिकाणी जाऊन आपल्या कर्तबगारीवर व कलात्मकतेच्या आधारावर चमकला असावा. अनेक अभ्यासकांची अनेक मते आहेत. असे असले तरी एखाद्या समाजाचे मातीशी जडलेले नाते काहीतरी सांगून जाते. ते समजून घेतलेच पाहिजे. नाशिकमधील पंचवटीमधील मंदिरे, तिथले ते उत्कृष्ट शिल्पकाम आगरी पाथरवटांनी घडवले आहे. घारापूरची लेणी जगप्रसिद्ध आहे. त्या भागाचे मूळ नाव ‘अग्रहारपुरी’ असे होते. अग्रहारपुरी म्हणजे आगरी लोकांची नगरी होय. इथली भव्यता दर्शवणारी सुंदर शिल्पे आगरी पाथरवटांनी घडवलेली आहेत. घारापुरीमधील स्तंभ व शिल्पे यांची रचना वेरुळच्या हुमाळ लेण्यांसारखी आहे. तिथेही आगरी कलावंतांच्या हातांचा स्पर्श झाला आहे. आगरी माणूस जसा उत्तम शिल्पकार, तसाच तो नावाजलेला संगीतकारही आहे. अलिबागेतील कोपरचा अच्युत ठाकूर एक नावाजलेला प्रख्यात संगीतकार म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात प्रसिद्ध आहे. कोपर गावच्या एका आगरी माणसाने तमाशाचा फडसुद्धा उभारला होता. काही आगरी पूर्वी खाणीमध्ये काम करायचे, त्यांना ‘आगळे-आगरी’ असे संबोधले जायचे. अनेक पैलू असलेला हा समाज मूळचा लढाऊ बाण्याचा आहे. ‘कलावंत’ या वृत्तीपेक्षा ‘लढवय्या’ म्हणून तो अधिक प्रसिद्ध आहे.

विशेषत: रायगड जिल्ह्यात कृषीवलनेते म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्वर्गीय नारायण नागू पाटील यांनी प्रचंड लढा उभारला. ते आगरी म्हणून इतिहासाने त्यांना जितके हवे तितके स्थान दिले नाही. आमच्या स्वर्गीय नारायण नागू पाटील यांचे कार्य सातार्याच्या क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याच तोडीचे आहे. किंबहुना, त्यांच्याहून काकणभर सरस ठरेल असेच कार्य नारायण नागू पाटील यांनी केले आहे. अलिबाग तालुक्यात चरी गावामध्ये दि. २७-१०-१९३३ रोजी परिसरातील पंचवीस गावामधील शेतकर्यांची सभा बोलावून नारायण नागू पाटील यांनी शेतकर्यांना संपाचे आव्हान केले. शेतकर्यांनाही वाटायचे- ‘आमचा तारणहार फक्त नारायण नागू पाटीलच!’ शेतकर्यांचा संप सुरु झाला. हा संप १९३९ साली मिटला. जगाच्या पाठीवर सहा वर्षे टिकलेला शेतकर्यांचा एकमेव यशस्वी संप म्हणजे चरी-कोपरचा शेतकरी संप होय. या संपाचे नेतृत्व नारायण नागू पाटील यांनी केले. संपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अनंत चित्रे यांनी पाठिंबा दिला. बंगालच्या निळ पिकविणार्या शेतकर्यांच्या चळवळीपेक्षा हा लढा मोठा आहे. बार्डोलीच्या शेतकर्यांच्या सत्याग्रहापेक्षाही ‘चरी-कोपर’च्या शेतकर्यांचा लढा मोठा होता, पण शालेय इतिहासामध्ये याची नोंद दिसत नाही, असे का? चरी-कोपरच्या आगरी शेतकर्यांच्या संपामुळे खोती पद्धती उद्ध्वस्त झाली. कुळकायदा अस्तित्वात आला. नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली चिरनेर परिसरात अक्कादेवीच्या जंगलात ‘जंगल सत्याग्रह’ झाला. या सत्याग्रहामध्ये आगरी माणसासोबत आदिवासी बांधवसुद्धा खांद्याला खांदा भिडवून लढले. जंगल सत्याग्रहींना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मदत केलीच, पण सुभाषबाबूंनीसुद्धा सहकार्य दिले होते. स्वत: सुभाषबाबू जंगल सत्याग्रहींना भेटण्यासाठी पनवेलमध्ये आले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा