रविवार, २० नोव्हेंबर, २०११

घरातही आगरी बोला
 







अविनाश पाटील यांचे आवाहन

आगरी साहित्य संमेलनाचे झोकात उद्घाटन



दोन मालवणी माणसे एकत्र भेटल्यावर मालवणीत बोलतात. पण दोन आगरी माणसे मात्र आगरीमध्ये बोलताना दिसत नसल्याची खंत व्यक्त करत, आपण आपल्या घरात आगरी बोललो तरच शिकलेली भावी पिढीही ही भाषा बोलेल. विकासाच्या बुलडोझरखाली आपली भाषा, इतिहास व संस्कृती चिरडली जाणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन नवव्या आगरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी वाशी येथे केले.

वाशी गावातील कविवर्य परेन जांभळे साहित्य नगरीमध्ये मोठ्या उत्साहात आगरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले.

यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, अभिनेते विनय आपटे, कवी मंगेश पाडगांवकर, अशोक नायगावकर, आगरी साहित्य विकास मंडळाचे संस्थापक मोहन भोईर, संमेलन कार्याध्यत्र दशरथ भगत आदी उपस्थित होते.

आगरी बोलीतील साहित्याचा मुंबई विद्यापीठात समावेश झाला आहे. आपण आगरी भाषेत लिहित असलो तरी ती मराठी भाषेच्या वृक्षाचीच फांदी आहे. आगरी साहित्यातून या समाजाच्या व्यथा व प्रश्न सर्वांसमोर येऊ लागले आहेत. सारेबाराचा फलाट, रायता, वस्ती नसलेल गाव, एसईझेड, हरकत काय तुमची, अशा साहित्य कलाकृती जन्माला येऊ लागल्याचा उल्लेख पाटील यांनी केला.

भाषा समृध्द करण्यासाठी साहित्यिकांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. आपल्या मायबोलीत साहित्याची चळवळ रुजू लागली असून सर्वांनीच या चळवळीस हातभार लावला पाहिजे, असे मत गणेश नाईक यांनी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा