रविवार, १६ फेब्रुवारी, २०१४

१० मनपथ म्हणजेच रताळ्यांची चाळ.

१० मनपथ म्हणजेच रताळ्यांची चाळ.

February 4, 2014 at 6:32pm
बाबल्याच्या काकान त्येका मुंबयत काम बघीतलान आणि मालवणातल्या मोकळ्या वातावरणातलो बाबलो मुंबयत इलो. काकान त्येची –हावची सोय १० मनपथवर केलेली असल्या कारणान त्येका फक्त थय जावन कामावर हजर –हवचा हुता. तसा बाबल्याचा शिक्षाण जेमतेमच. १०वी पास झालो आणि बाबल्यान शाळेक रामराम केल्यान. बाबलो तसो सरळ मनाचो पन त्वांड उघडल्यान की समोरचो माणुस “शीरा इली तुझ्या तोंडार” असा म्हणल्याबिगार –हावचो नाय. जा काय असात ता त्वांडावर ह्यो बाबल्याचो शिरस्तो. त्येच्यामुळा त्येका गावात लोका “फाटक्या तोंडाचो बाबलो” म्हणान सुद्धा वळखीत हुती. बाबल्याचो बापुस बाबलो सातवीत असतानाच वारलो. आवशीन बाबल्याच्या बापसाच्या दुकानाच्या आधारार बाबल्याचो आणि बाबल्याच्या बहिनिचो म्हनजे बेबल्याचो सांभाळ केलान. बाबल्याचा शिक्षणात मन रमात नव्ह्ता म्हणान त्येना १० वी नंतर शाळा सोडल्यान आणि दुकानार आवशीक मदत करुक लागलो. कायव वर्षान त्येच्या काकान त्येका मुंबयत एका प्रेसमधली नोकरी बघितल्यान आणि बाबल्याक मुंबयक येवाक सांगितल्यान. आणि मग ह्यो बाबलो मुंबयक इलो.

रेल्वे स्तेशनार काका बाबल्याक घेवक इलो आणि गावची खुशाली सांगुन झाल्यार बाबलो काकाच्या मागना चालत –हवलो. लोकल ट्रेनच्या गर्दीतना बॉडी मसाज घेवव बाबलो आणि काका उतारले. काका बाबल्याक दादर स्टेशनची म्हायती सांगत हुतो आणि बाबलो गप गुमान बघात चाललो हुतो. येक गोष्ट बाबल्याक जाणवली गावच्या लाल मातीतलो ओलावो हय न्हवतो. हुतो तो फक्त सिमेंट आणि रेतीचो खडबडीतपना. लोकांका बाजुचो माणुस दिसत न्हवतो. दिसत हुतो तो फक्त रेल्वेचो इंडिकेटर. स्टेशनाच्या भायर येवान काकान टॅक्सी थांबवलान. सामान मागच्या डिक्कीत टाकलानी आणि ड्रायवराक टॅक्सी १० मनपथवर घेवक सांगीतल्यानी. काका अधना मधना गावची चौकशी करीत हुते आणि बाबलो त्येंका उत्तर दीत हुतो. मुळात पंचक्रोशीत ‘इरसाल’ म्हणुन फेमस असलेलो बाबलो मुंबयत मात्र गरीब गायीसारखो वागत हुतो. पयल्यांदाच घरापासना लांब इल्याकारणान असात असो इचार काकानी केल्यानी आणि त्ये पन गप –हवले.

गाडी १० मनपथच्या गेट समोर उभी –हवली तसा बाबल्यान खिडकीच्या काचेतना भायर बघितल्यान. गेटच्यावर मोठी कमान हुती. कमानीर एक मोठो बोर्ड हुतो. त्येच्यार चाळीचा नाव लिवलेला हुता. १० मनपथ आणि कंसात पुर्वाश्रमीची रताळ्यांची चाळ. रताळ्यांची चाळ म्हट्ल्यार बाबल्याक पु.लं.चो अंतु बर्वा आठवलो. आणि क्षणात बाबल्याच्या मनात एक मजेशीर इचार तरळुन गेलो. “ रत्नागीरीचो तो अंतु बर्वो पु.लं.च्या बटाट्याच्या चाळीत कधी इलो नसतलो पन मालवणातलो ह्यो बाबलो रताळ्यांच्या चाळीत इलो.” मनात ह्यो इचार घोळवत बाबलो टॅक्सीतना खाली उतरलो आणि त्येना मनातच रामेसराक साद घातलान. “आता पुढ्यात काय वाढुन ठेवला असात ता तु निस्तर रे रामेसरा.”

काकांच्या मागना बाबलो चालुक लागलो. चाळीतली लोका ह्यो कोण नवीन म्हणान बाबल्याक बघुक लागली. काकांची खोली पयल्या माळ्यार हुती. बाबलो आणि काका जिन्याजवाळ इले आणि समोरना एक ४३ वर्षांचो तरुण घाईघाईत उतारलो. काकांनी त्येका बघुन नमस्कार केल्यानी. म्हणान बाबल्यान प्ण नमस्कार केल्यान. काकानी त्येका इचारल्यानी, “ काय चाहुल, खय चाल्लस?”

तो – मी खय जातय ता म्हत्वाचा न्हाय, चाळीत म्हायतीचो अधिकार आमच्या कमीटीन आणलेलो असा.

काका – मी खय न्हाय म्हनतंय, पर तो अधिकार आमका मिळुक व्हयो म्हनान उपोषण अन्नांनी केलानी ना?

तो – आमच्या कमीटीन चाळीतल्या बायकांका सशक्त केल्यान.

बाबल्याक काय चालला ता कळात नव्ह्ता, म्हणान त्येना मागे बघितलान. तर एक भाताच्या कणगी एवढी बायल तीच्या मुसळासारख्या घोवाक कुटत हुती. बाबल्याक वाटला हि बायल ह्येंच्या कमीटीच्या योजनेची लाभर्थी असात.

काका – ता मात्र खरा. ती बघ. सद्याची बायल सद्याक कशी धुता हा ती.

तेवढ्यात त्येना बाबल्याक त्येचो गि-हाईक बनवलान.

तो - चाळीत म्हायतीचो अधिकार आमच्या कमीटीन आणलेलो असा.

बाबलो – असा काय? काय असता तो?

तो - आमच्या कमीटीन चाळीतल्या बायकांका सशक्त केल्यान.

बाबलो – ता खाली दिसता हा.

तो – माझ्या बापसान चाळीत पयलो कंप्युटर आणलान.

बाबलो – बरा मग, मस्त असात ना तुम्चा.

तो – माझ्या बापसाक चाळीतल्या कट्टर इचारांच्या लोकांनी मारलानी.  माझ्या आजयेक पन मारल्यानी. आता माका पन मारतले.

बाबलो – मग चाळ सोडुन दुसरीकडे –हवाक जावा ना?

तो – माका मरणाची भिती नसा. माझ्या आवशीन सकाळी्च माका डाबर च्यवनप्राश देताना सांगीतलान, सत्ता हि इखापरमान असता.

बाबलो – मग माका पन मारतील म्हणान बोंबल्तास कित्याक?

तो - चाळीचो इकास ह्योच माझो ध्यास.

बाबलो – मग करा ना इकास.

तो – आम्ही गेली कितिक वर्षा चाळीचो इकासच केलाव.

एवढ्यात कोणतरी ओरडला, “मोनियाबाय, पाणी येत नाय हा.”

बाबलो – बरा, मग आता काय –हवला?

तो – आमका आणखी इकास करुचो असा. त्येच्यासाठी आमका परत निवडुन देवा.

बाबलो – आत्ताच म्हणालास ना कि, सत्ता इख असता. मग कशाक इखाची परिक्षा घेतास?

तो – आमच्या कमीटीन चाळीतल्या म्हयलांका सशक्त केलान.

बाबलो – ह्या माझ्या प्रश्नाचा उत्तर न्हाय हा.

तो – आमच्या कमीटीन चाळीत म्हायतीचो अधिकार आणल्यान.

बाबलो – तो काय असता?

तो – माझ्या आज्येक मारल्यानी. आत्ता माका पन मारतले.


बाबल्याचा डोका आता फिरुक लागला. आता ह्यो दोनचार गाळ्यो देनार ह्या ओळखलेल्या काकांनी बाबल्याच्या हाताक धरान “ काकीन केलेली च्याय थंड व्हयत” असा म्हणात त्येका खेचल्यानी. तो ४३ वर्षांचो तरुन पाठमो-या बाबल्याक बघीत
–हवलो.


बाबलो – नानानु, कोण हुतो ह्यो खुळो?

काका – कमीटीच्या अध्यक्षीन बाईचो झील. चाहुल नंदी. त्येका अध्यक्ष बनुचा असा.

बाबलो – ह्या असल्या खुळ्याक कोण अध्यक्ष करतला? चाळीत इल्या इल्या पयला रताळा भेटला.

काका – जावन दे रे…..

"नया है वह......"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा