रविवार, १५ डिसेंबर, २०१३

आ ग री जा ती चा इ ति हा स

आगरी – यांस आगळे कुणबी असेंहि म्हणतात. हे अजून मराठ्यांत मिसळले नाहींत. हे लोक ठाणे जिल्हा कुलाबाजिल्हा व जंजिरें संस्थान यांतून आढळतात. यांची एकंदर लोकसंख्या १९११ सालीं २३३५५३ होती. पैकीं ठाणें जिल्ह्यांत ९६५४८ व कुलाबा जिल्ह्यांत ११६७११ अशी आगरी वसति होती. १९११ सालच्या खानेसुमारींत स्वतः-काम करणारे असे ६२५४५ पुरुष व ४७००० स्त्रिया यांच्या धंद्याची वर्गवारी काढिली होती. तींत असें आढळून आलें कीं, ४७८९९४ पुरुष व ३५४८१ स्त्रिया शेतकी करितात. केवळ ६१ पुरुष व ६२ बायका, भिकारी, गुन्हेगार किंवा अनीतीचे धंदे करणारे सांपडले. शुद्ध आगरी, दास आगरी व वरप आगरी असे या जातीचें तीन पोटविभाग आढळतात.

शु द्ध आ ग री. - या जातीच्या मिठ आगरी, जस आगरी, ढोल आगरी अशा तीन शाखा आहेत. यांचा परस्परात रोटीबेटी व्यवहार चालतो. हे ठेंगणे व काळे असून कष्टाळू असतात. यांचा पेहेराव म्हणजे कमरेभोंवतीं गुंडाळलेलें आंखूड धोतर, अंगरखा, कुणबी पद्धतीचें पागोटें असा असतो. हे  कट्टे दारूबाज असतात. यांचा नित्याहार तांदूळ, मासे वगैरे असतो. याचे व्यवसाय, शेतकी, मीठ तयार करणें वगैरे असून हे व्यवहारांत मितव्ययी व चोख असतात. सर्व हिंदू देवता यांना मान्य आहेत. त्याच्या आवडीची दैवतें म्हणजे चेडा व इतर स्थानिक देव होत. मद्यपी असल्यामुळें हे प्रायःद्रव्यहीन असतात.

दा स आ ग री. - यांच्या उत्पत्तीसंबंधी पुढें दिलेली दंतकथा नमूद करण्यासारखी आहे. एका आगरी स्त्रीचीं मुलें वाचत नव्हतीं. तेव्हा तिनें महारांच्या देवाला असा नवस केला कीं, माझें मूल जर जगेल तर मी डोक्यावर गाईचें हाड व कानावर लोंकरीचें फूल खोंवून महारवाडयांत प्रवेश करीन. नवसानंतर तिचें मूल जगलें व तिनें आपला नवस फेडला. या धर्मबाह्य कृत्याबद्दल तिला जातिबहिष्कृत केलें. दास आगरी हे तिचें वंशज आहेत. यांचा शुद्ध आगऱ्याशीं रोटीबेटीव्यवहार नाहीं.

व र प आ ग री. - हे एके काळीं ख्रिस्ती होते. असें दाखविणारे पुरावे यात शिल्लक आहेत. कारण याच्यांत गोमझ, सोझ, फर्नम वगेंरे आडनावें आढळतात. रामचंद्र बाबा जोशी, भाई मुकुंद जोशी व विठ्ठल हरि नाईक वैद्य या तिघां माध्यंदिन ब्राह्मणांच्या साहाय्यानें त्याना पावन करून पुन्हां जातींत घेतलें असें म्हणतात (इ.स.१८२०-२८) यावारून यांना नवे मराठे असें म्हणतात. शुद्ध आगरी व दास आगरी यांना हलके मानतात. यांचा धर्म व आचारविचार इतर आगऱ्याप्रमाणेंच आहेत.
आगरी लोकांची विशेष मद्यासक्ति व त्यांची हलक्या सलक्या देवतांची उपासना हीं पाहून आर्य व अनार्थ यांच्या विषयीं चुकीच्या कल्पना बाळगणारे खानेसुमारीकार त्यांनां अनार्य समजतात. मॉकिनटाश व विल्सन त्यानां कोळी समजतात (ट्रॅन्झॅ. बॉम्बे. जिऑ. सोसायटी १.१९४).

आ ग री जा ती चा इ ति हा स. - हा आगरी मंडळी येणें प्रमाणें सांगतातः- सुमारें ६०० वर्षांपूर्वी अलीबाग तालुक्यांत तीन लहान लहान राज्यें होतीं. एक चौलास, दुसरें आवास सासवणें येथें व तिसरें सागरगड येथें. चौल व आवास येथें हिंदू राज्यें होती व सागरगडावर दिल्लीच्या बादशहाच्या वतीनें मुसुलमान सरदार रहात असून तो दोन्ही हिंदू राज्यांजवळून करभार वसूल करून तो दिल्लीस पाठवी. पुढें सागरगडावरील मुसुलमान सरदार बलाढ्य होऊन दिल्लीस कारभार पाठवीनासा झाला व बादशहाचे हुकूम अमान्य करूं लागला. म्हणून दिल्लीच्या बादशहानें एक सरकाद त्याच्या पारिपत्याकरितां पाठविला; परंतु त्यास यश न येतां तो दिल्लीस परत गेला. नंतर बादशहानें दुसरा सरदार पाठविण्याचें ठरवून मुंगीपैठणाचा राजा बिंब यास पत्र पाठवून दिल्लीहून येणाऱ्या सरदारास मदत करण्याविषयीं विनंति केली. राजा बिंब यानें ती सरकारची विनंति मान्य करून आपलें सर्व सैन्य घेऊन ठरल्याप्रमाणें दिल्लीहून येणाऱ्या मुसुलमान सरदारास ठाण्याजवळ येऊन मिळाला. मुसुलमान सरदरानें पश्चिमेच्या बाजूनें जाऊन गडावर स्वारी करावी, व लढाईस सुरवात झाली म्हणजे राजानें आपले लोक घेऊन पूर्वेकडील बाजूनें गड चढून हल्ला करावा असें ठरलें होतें. त्याप्रमाणें दोघेहि चाल करून गेले. पश्चिमेच्या बाजूस लढाईस सुरवात झाल्याबरोबर राजा बिंबानं आपल्या सर्व लोकांसह गड चढून छापा घातला; व गडावरील सरदारांचा मोड करून त्यास पकडून दिल्लीहून आलेल्या सरदाराबरोबर त्यास दिल्लीस पाठवून दिलें व आपण गडावर राहून राज्यकारभार पाहू्ं लागला. कांहीं दिवसांनीं त्यानें चौल व आबास सासवणें येथील राज्यें जिंकलीं. आसपास कोणी शत्रू नसल्यामुळें राजानें परत जाण्याचा बेत रहित करून तेथेंच कायमचें राज्य स्थापण्याचें ठरविलें. त्यच्या सैन्यासहि हा बेत पसंत पडून तें तेथेंच राहिलें. शांततेच्या वेळीं इतक्या मोठ्या सैन्याची जरूर नसल्यामुळें राजानें पुरेसे लोक पदरीं ठेवून बाकींच्यांनां मिठागरें बांधून दिलीं व जरूर त्या ठिकाणीं गांवठाणें बसवून तेथें वसाहत करण्यास सांगितलें. मिठागराचे उत्पन्न चांगलें व किफायतशीर असल्यामुळें मुंगीपैठणास जाण्यापेक्षा येथेंच राहणें या लोकांस अधिक आवडलें. राजा बिंबानंतरहि त्यचे वंशज हें राज्य पुष्कळ वर्षे सुरळीतपणें चालवीत होते. या इतिहासामध्यें बिंब हा बादशाहाच्या विनंतीवरून त्याच्या मदतीसाठीं इकडे आले हे विधान संशयास्पद आहे.
पुढें हळूहळू मिठागरें व वसाहती वाढत जाऊन आगरी लोकांची वसति कुलाबा जिल्ह्यांतील अलीबाग, पेण, पनवेल, कर्जत, रोहों व माणगांव तालुक्याचा थोडा भाग येथे व जंजिरा व ठाणें जिल्ह्याचा बराच भाग या ठिकाणीं पसरत गेली. जेथें खारटपणाचा भाग आहे तेथें व त्याच्य लगतच्या प्रदेशांतच फक्त आगरी लोकांची वसति पसरलेली आहे, याचें कारण असें दिसतें कीं मिठागराचा धंदा चागंला व किफायतशीर वाटल्यामुळें राजाबिंबोंन मिठागरें बांधून दिलीं तीं त्याच्या बरोबर असलेल्या लोकांसच पिकविण्याचा हक्क दिला असावा व त्यामुळें दुसऱ्या लोकांचा या धंद्यांत शिरकाव झाला नसावा असें दिसतें. याप्रमाणें हा धंदा आगरी जातींत पिढयानुपिढया चालत आलेला आहे असें हल्लीच्या स्थितीवरूनहि स्पष्ट दिसत आहे. नवीन आलेल्या लोकांचा मुख्य धंदा आगराचा होऊन राहिल्यामुळें व अपरिचितपणामुळें त्यांच्या जातींचें नांव मूळच्या लोकांस माहीत नसल्यामुळें मूळचे लोक ह्या नवीन लोकांस आगरी, या नांवानें संबोधूं लागले व पुढें हेंच नांव त्या विशिष्ट लोकांच्य जातीचें नांवें धंद्यांवरून पडेलेली आहेत या तत्वास धरूनच या जातीचा आगर पिकविण्याचा मुख्य धंदा झाल्यामुळें या जातीस आगरी हें नांव पडलें असे दिसतें.
                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                           ज्ञा ती चा आ त्मो न्न ती सा ठीं प्र य त्न. - हा त्यांच्या खालील पुडाऱ्यांच्या प्रयत्नावरून लक्षांत येईलः १. कै. जनार्दन हिराजो दमामे जे.पी. रहाणार मुंबई,;हे  ज्ञातींतील पहिले जे.पी. होत. हिंदुमुसुलमानांच्या दंग्याच्या वेळीं ह्यांनी आपल्या ज्ञातीतर्फे चांगली कामगिरी केली. २. कै. रामजी बाळीजी म्हात्रे रा. मुंबई; ज्ञातींतील पहिले मोठे कंत्राटदार. मुंबई येथील टाक बंदर येथें यांनीं स्वखर्चांनें ज्ञातीसाठीं श्मशानभूमि व धर्मशाळा बांधलेली अहे. ३.श्रीयुत-तुकाराम धर्माजी मोकल, राहणार हाशिवरें तालुका अलीबाग जि. कुलाबा;ह्यांचे घराणें पुरातन असून ह्यांनीं मद्यापाननिषेधासाठीं व ज्ञातिबांधवांची सांपत्तिक स्थिति सुधारण्याविषयीं बरेच प्रयत्न केले व करीत आहेत. ४. कै. बाबाजी नारायण पाटील मंबई;ज्ञातींतील दुसरे कंत्राटदार, मुंबई येथील आगरी पाडयाचे संस्थापक, देऊळ बांधून त्यांत हल्लीं त्यांनीं मोफत शाळा चालू केली आहे. ५ श्रीयुत विठोबा राघो पाटील. रहाणार शहाबाज, तालुका अलीबाग, जि. कुलाबा; हे ज्ञातींतील प्रमुख व्यापारी असून चालू असलेल्या ज्ञातिहितकारक चळवळींचे चालक व आधारस्तंभ आहेत. ६.कै.हरी जोमाजी पाटील. रहाणार शहाबाजः हे आपल्या वयाच्या पंधराव्या वर्षांपासून ज्ञातिहितकारक चळवळींत पडूं लागले. ज्ञातिपरिषदेचे उत्पादक व कार्यकारी चिटणीस ७. श्रीयुत लक्ष्मण गोविंद पाटील. राहणार वाघ्रण, तालुका अलीबाग, जि. कुलाब; हे आपल्या वयाच्या पंधराव्या वर्षांपासून ज्ञातिहितकारक चळवळींत आहेत. मुंबई येथील आगरी विद्यार्थीं-आश्रमाचे संस्थापक.  ८.श्री. शाहू हरी पाटील. राहणार वाघ्रण, तालुका अलीबाग, जि.कुलाबा; आगरी अनाथ विद्यार्था-फंडाचे उत्पादक. ९ कै. लक्ष्मण तुकाराम पाटील. राहणार कर्जे, पेटा उरण, जि.कुलाब. १०  श्रीयुत–महादेव रामजी घरत. राहणार मुंबई; आगरी परस्पर सहकारी पतपेढीचे उत्पादक व कार्यकारी अद्यक्ष. ११ श्री. लक्ष्मण गमाजी म्हात्रे, तालुका पनवेल, जि. कुलाब; हे पुरातन घराण्यांतील असून ज्ञातीचे पुढारी आहेत.

नि वा डे व ठ रा व. - ज्ञातिसभेंत कसकसे निवाडे होतात व अखिल ज्ञातीच्या हितसंवर्धनार्थ कोणकोणते ठराव पास होतात यांची माहिती होण्याकरितां पुढील निवाडपत्रें व ठराव दिले आहेत.

श्री
सभापत्र शके १७५१ मनमथ नाम संवत्सरे वैशाख वद्य १३ रविवार, संमस्त गोतगंगा मीठ आगळे एकवीस पाटील व चोगळे व कुळे समस्त गोतगंगा यामध्यें अर्ज करतो, रामीबाई विठु गोविंद म्हात्रा याची बायको ही अर्ज करतो, मी हेल घेऊन माहीमास गेलो होतो तर तेथें चार घटका जाले. रात्र समय आठ वाजले म्हणोन दिसत नाहीं तर तिचे बापानी घराची भारतर पो नागू मराठा व बालू मराठा हे दोघे धनी पो तर ते माहिमा जागून सोधून गाडी करू येत होते. की गाडी लौकर येईल म्हणोन गाडी केली ती गाडी रो दाही तेथें दुस्ती जाली. मग मी म्हणलुं की मज रात्र झाली. ये दोघे धनी नेवावयास आले तर आम्हांस सोरऊन दिली. म्हणून माझ्या बइठकी दोन वेळा केल्या कीं तूं गारीन बसलीस. म्हणोन नवऱ्यानं टाकून दिली तर मजला कासी गंगेची आगत्य लागली. म्हणोन भवताई मिळविली. तर कासी गंगेनें विचार केला कीं, रामी बाईचे पदरीं कांही दोस नाहीं. म्हणोन कासी गंगेनें पंक्ति पावन केले. जाती मिळती केली व रामी बाईंनें पाट लावला होता तो कासी गंगेनें माफ केला. सर्वे जे केले ते कासी गोताचे अनुमतें झाले. तर गोताचा जेवान खर्च मिळूल घेतले रूपये २०. बाई रामीस पंक्ति पावन केले. मागें मोरें कोनी देजा विसी निघाला तर कासी गोत जबाब देईल. हे लिहून दिले सही हस्त अक्षर धर्मा हास म्हात्रे मु॥ मुंबई मीठ आगळे.
हें पत्र लिहून माहूलकर पाटील यास पे॥ तर तुम्ही मान्य करने हरकत कोणाचे ऐकोन न करने. हे सभापत्र लिहून दिले सही.
(२४ इसमांच्य सह्या)

श्री.
सभापत्र शके १७६२ साखरी नाम संवत्सरे माहे मार्गेश्वर शुद्ध १४ दिवस मंगळवार ते दिवशी वरालकर व नागांवकर व माटुंगकर व सीवकर व खारकर व शिवरीकर व बामनोलीकर, व भोईवारीकर व ठाकूरकर व माहीमकर व मांजगावकर व वालकर, व डोंगरीकर व गीरगांवकर समस्त गंगा कासांगोत सुद आगळे श्री पांडुरंगाचे देवळांत बसून ठराव केला ऐसीजे. देवजी भोकर म्हात्रा मुक्काम शीव यानें दुसऱ्याचें अन्न भक्षिले शिजले. या करितां ब्राह्मणापासून शास्त्रविधि मार्गेकरून गंगेचे अनुमत्येकरून सुध केले व गंगावंतानी देवदंड रुपये अडीच व गोतदंड रुपये अडीच व दोघे घेऊन गंगागोतानी पंक्तिपावन केले यासी कोणी भ्रष्ट मानूं नये. यास दोष ठेऊं नये. जो ठेवील त्यास गोतदंड रुपये ५० व देवदंड रुपये ५० व सरकार दंड रुपये ५०.
( २६ इसमांच्या सह्या)

॥ श्री ॥
समस्त शुद्ध आगळे ज्ञात गंगाकाशी प्रांत उत्तर कोंकण जिल्हे-मुंबई, ठाणा, कुलाब नाशिक असे एकमत होऊन खालीं लिहिल्याप्रपाणें ठराव पसंत करून कायम केले आहेत;त्यांविरुद्ध कोणीहि वागूं नये; विरुद्ध वागणारानें पंचवीस रूपयेंपर्यंत जात गंगेच्या फंडांत द्यावे लागतील व त्यास गुन्हा केल्यापासून रुपये देईपर्यंत अपंगत ठेविले जाईल.

लग्नाच्या खर्चांचे ठराव.
१। साखपुडा सव्वा रुपया
२० मुलाच्या बापास घेणें असल्यास तांदुळसुद्धां वीस रुपये
५ जातीस पांच रुपये
५ सावर्धन पांच रुपये.
८॥नवरीस वस्त्रें साडेआठ रुपये.
३०दागिने देज घेतलें असल्यास रुपये तीस.
२। ब्राह्मणास दक्षणा सव्वा दोन रुपये (मुला-कडून १ ॥ रुपया व मुली कडून ॥।)
१॥ जातगंगेस (मुलाकडून एक रुपया व मुलीकडून.॥। ॥। पाटलाचे बैठकी बद्दल बारा आण.

पाटाच्या खर्चाचे ठराव.
१० पूर्वींचे घरच्या वारसास पूर्वीं देज दिलें असल्यास दहा रुपये.
१०नवरे मुलीस घेणे असल्यास दहा रु.
५ जातीस पांच रुपये.
५॥ नवरीस वस्त्रें साडेपांच रुपये.
२५ दागिने देज घेतलें असल्यास पंचवीस रुपये.
१। ब्राह्मणास दक्षणा सव्वा रुपया.
१ जातगंगेस.

( १ ) कोणाही जात गृहस्थानें दारू किंवा ताडी पिऊं नये व जुगार खेळूं नये. आमंत्रण असल्याखेरीज कोणी कोणाचे घरीं कार्यीं प्रयोजनीं जाऊं नये. नुसतें आमंत्रण असल्यास एकाच मनुष्यानें जावें व सर्व मंडळीस असल्यास सर्वांनीं जावें. या विरुद्ध वागणुकीचा कोणी कोणावर पुरावा करून दिल्यास गुन्हेगारास वर दर्शविलेली सजा केली जाईल व पुरावा देणारास पांच रुपये बक्षीस दिलें जाईल.
( २ ) व्यभिचार करण्याची आपले जातींत सक्तमनाई आहे. व्यभिचार करणारांस जातींतून अपंगत ठेविलें जाईल व त्याबद्दल पुरावा करून देणारास दहा रुपये पर्यंत बक्षीस दिलें जाईल.
( ३ ) कोणाही जातगृहस्थानें एकीपेक्षां अधिक बायका करूं नयें. लग्न होऊन बरींच वर्षे मूलबाळ होत नसल्यास किंवा बयको हमेशा आजारी असल्यास जातीस तसें कळवून जातीच्या हुकमानें दुसरी बायको करावी. विनाकारण एकी पेक्षां अधिक बायका करणारास गुन्हेगार ठरवून पंचवीस रुपयांवर रुपये जातीचे फंडांत द्यावे लागतील.
( ४ ) वयांत आलेली नवरा असलेली स्त्री कोणीहि आपलेकडे दहा दिवसांपेक्षां अधिक दिवस ठेऊं नये. तीस नवऱ्याकडे पोचती करावी व ती बाई ऐकत नसल्यास जातीस कळवावें. कोणाची स्त्री किंवा मुलगी वाईट चालीची निघाल्यास किंवा ती कोठें निघूल गेल्यास तिच्याद्दल बातमी त्यांना '' जातीस दिलीच पाहिजे. हा नियम मोडणारास पंचवीस रुपयांवर रुपये जातीचे फंडांत द्यावे लागतील.
हे नियम आमच्या गांवकऱ्यांस कबूल आहेत.

आ ग री भा षा. - ही भाषा देशी कुणब्यांच्या भाषेहून बरीच भिन्न आहे. दोन आगरी पुरुष एकमेकांशीं झपाटयानें बोलत असतां अपरिचित पांढरपेशास त्यांच्या बोलण्याचा उलगडा चटकन होत नाही. आगरी बायका बोलूं लागल्या तर त्यांचे बोलणें समजू घेण्याच्या कामांत त्या पांढरपेशाची त्रेधाच उडते. त्यांच्य भाषेंत विशेष पुढीलप्रमाणें आहेत.

१. वर्णः - ( १ )  'ग' च्या ठिकाणीं मूर्धन्य 'ज' चा प्रयोग करितात. उ. जेला-गेला. 'जेला हें रूप 'गेला' ह्या रुपापेक्षां मूळ धातू जो 'जा' त्याशीं अधिक मिळतें आहे. ह्याप्रमाणेंच 'घ' च्या ऐवजीं मूर्धन्य 'झ' योजितात. उ. 'झेतलें' = 'घेतलें'; 'झ्या' = 'घ्या'. पण 'क' 'ख' च्या ऐवजी 'च' 'छ' यांचा प्रयोग करीत नाहींत. (२) 'ड' च्या बद्दल 'र' ची योजना करितात. उ., 'उराला' उडाला आणि कधीं कधीं, 'र' च्या ऐवजीं 'ड' योजितात. उ. 'वाडा' = वारा; 'आगरी'. 'लय' मोठा वाडा आला नी वारा उरून जेला' = ' फार मोठा वारा आला आणि वाडा ( गुरांचा गोठा रानांत बांधितात  तो) उडून गेला. ' (३) कधीं कधीं 'र’ च्या ठिकाणीं 'हि' ऐकूं येतो. 'उ०' मुलगा लरतो'- ' मुलगा रडतो'!

२ नामें:- ( २ ) गोंड=भोसकूं, कुंपणांत पाडलेली वाट. उ० टोणग्यांनीं वंईत तीन गोंड पाडले=कुंपणांत तीन भोसकीं पाडून वाटा केल्या. ( २ ) 'हेतू' = आठवण, स्मरण. उ०, 'त्या कामाची मला हेतू राहिली नाहीं, असा हेतू शब्दाचा स्त्रीलिंगी प्रयोग आठवण ह्या अर्थी योजितात.  ( ३ ) 'अदावत’ – अडचण उ. 'हें शेत घेतां, पण त्यांत लय अदावत आहे' म्ह. अडचण आहे. गांडीवाटेंत दगड, ओहोळ, झाडें, किती तरी अदावत!
३. सर्वंनामें:-( १ ) देशीं 'म्यां' ह्या तृतीयेच्या रूपाऐवजी 'मी' सर्वनामास तृतीयेचा 'नीं' प्रत्यय जोडून 'मिनीं' असें रूप साधितात. उ० 'मिनीं काय केलें?'  सदरहूप्रमाणें 'तूं' याचें रूप 'तुनीं' असें योजितात.  (२ ) 'मी' सर्वनामाची चतुर्थी 'मना' अशी योजितात. उ०, 'मना माहीत नाही' 'मना काय ठाऊक?' आपली लहान मुलेंहि ' मना खाऊ दे' असेंच म्हणतात. हें 'न' आणि 'ल' याच्या अभेदाचें उदाहरण आहे. लिंब, निंब; लहाना = लाना = नाना (गुजराथी); 'लवणें = नवणें (हिंदी); ‘नमन’ (संस्कृत). (३) ‘काय’ ह्या सर्वनामास, द्वितीया, व चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय 'ला' तृतीयेचा प्रत्यय 'शीं' व षष्ठीचा प्रत्यय 'चा' लावून त्या त्या विभक्तींची रपें उपयोजितात. मात्र काय यांतील 'का' अक्षरास ऱ्हस्वत्व देतात. उ०, 'कयाला’ = कशाला, 'कयाशीं' = कशाशीं  ' कयाचा' 'कयाचीं' 'कयाचें = कशाचा, कयाची, कशाचें, इ. प्रचलित मूळरूपांतहि, 'का'  सऱ्हस्वत्व देऊन 'क' ह्या ऱ्हस्व अक्षराची योजना झाली अहे. 'ऐशी विद्या कशाला' 'ऐशी बाईल काशाला' 'कासया धरियला हय तो तुवां? वगैरे पद्यें सर्वश्रुत आहेत. तेथें 'काय' यांतील 'का' दीर्घच राहिला आहे. पण प्रचलित भाषेंत त्यास ऱ्हस्वत्व देऊन 'काशाला' इ. रूपें योजितात. त्याप्रमाणें 'कायाला' 'कायाशीं' 'कायाचा' अशीं रूपें न करितां कयाला, कयाशीं, कयाचा, अशीं रूपें आगरी उपयोजितात. मराठींत दोन दीर्घ अक्षरें एकत्र आलीं असतां एकास विशेषतः पहिल्यास ऱ्हस्वत्व देण्याचा स्वाभाविक जो प्रचार आहे त्यास अनुसरूनच 'का' स येथें ऱ्हस्वत्व आलें आहे. ( ४ ) 'कर्ता' (किती) हें संख्यानामवाचक प्रश्नार्थक सर्वनाम वापरतात, तें मराठींतील 'किती'पेक्षां संस्कृत 'कति' शीं अधिक मिळतें आहे. उ०, 'किती दिवस लागतील, ' 'किती दिवस लागतील? किती चुना मळला? =  किती चुना मळला, (५) 'बिसरा =  दुसरा. उ. 'बिसरा उपाय काय?' –दुसरा उपाय काय? 'बिसरा' पासूनच बिसरून = दुसरून = दुसऱ्यानें, पुन्हां असें अव्यय सिद्ध झालें आहे. येथें  'दु. ' च्या ठिकाणीं 'बु' व्हावयाचा. पण 'बु' पालटून 'बि च होतें.
४. क्रियापदें:- ( १ ) 'सांग' धातूच्या भूतकाळाचें रूप साधतांना शिष्ट भाषेंतील मध्यंतरींचा 'त' आदेश न योजितां, धोपट मार्गाचें रूप 'सांगलें असें योजितात. उ. मिनीं सांगलें' = मी सांगितलें. मागणें यांचे 'मांगलें', (हिदी 'मंगना'). उ०, त्यानें मांगलं म्हणून मिनीं दिलं. आपली मुलेंहि प्रथम बोलूं लागलीं म्हणजे मी 'करलें असेंच धोपट मार्गाचें रूप योजितात. प्याला, प्यायला ह्या रूपांच्या ऐवजीं 'पिला असें रूप पी धातूपासून सिद्ध करितात. उ०, बैल पाणी पिला. ( २ ) कांहीं क्रियापदांचे अर्थ देशावर माहीत नाहीत. उदाहरणार्थ, (अ) हिलगणें = अडकणें, अडकून, राहाणें. उ०, 'गवताची मोळी जाळींत । हलगली (अडकली). हें क्रियापद उर्दूंत व हिंदीत प्रसिद्ध आहे, पण देशी मराठींत नाहीं. (आ) पोगळणें = सुटणें, मोकळा होणें, विस्कळित होणें उ०, 'गवताचा थारा पोगळला' - सुटला,  विस्कळित झाला. ( इ ) कलणें, ( कळणें) = दिसणें. उ०, झाडावर जांबळें आहेत म्हणतां पण मला कलत नाहींत, (मला दिसत नाहींत, माझ्या नजरेस येत नाहींत). (ई) ओरडणें – हाक मारणें, बोलावणें. उ०, 'दादा तुला ओरडतात' = हाक मारतात. ( उ ) 'बोलणे' = उत्तर करणें. उ. ''मिनीं सांगले लौकर ये; तो बोलतो ( उत्तर करतो) काम आट पून येईन.''
५. अव्ययें:- (१) 'पासून' याची योजना 'पेक्षा' याच्या ऐवजी व रितात. उ०, 'बाजारी खोबरेलापासून नारळाचें तेल लय नामीं' = बाजारी खोबरेलापेक्षां नारळाचें तेल फार चांगलें. 'काळ्यापासून लाल्या जवाद तलख = काळ्यापेक्षां लाल्या अधिक तलख. ( २ ) बिसरून = दुसरून, दुसऱ्यानें पुन्हां. वर सर्वनामांमध्ये 'बिसरा' पहा. (३) मंग = मग, नंतर उ०, 'मी भाकर खाईन, मंग गुरांमागें जाईन.
घर, तर, मर इत्यादि शब्दांतील प्रथम 'अ' स्वराप्रमाणें 'मगा ह्यांतील पहिल्या 'अ' स्वरास ओढून दीर्घत्व देऊन उच्चारण्याचा परिपाठ मराठींत आहे. येथें तें दीर्घत्व 'अ’ ला ओढून न देतां त्यावर अनुस्वार देऊन साधिलें आहे.
आ ग री लो कां चीं कां हीं आ ड नां वें. = (१) भोईर, धुळे, डांगरे, मुठे, मेहेर, शेणे, कराळे, डाइरे, जोगले, वेखंडे, गोडे, ठाणगे, इ. (२) यांखेरीज मराठयांचीं आडनांवें त्यांच्यांत आढळतात तीं:-पोवार, जाधव, मोहिते, महाडिक, घोरपड, इ. धंद्यावरून व गांवावरून आडनांवें आहेत तीं:-भोपी, माळी, भगवत, इरमाळी, म्हसकर, कोंडिलकर, खारकर, इ.
आ ग री लो कां ती ल कां हीं नां वें. - पुरुषांचीः- हशा, उंद्र्या. हेंद्य्रा, झावऱ्या, बेंडया, चांग्या, बामा, गोमा, चाया, पोशा, धाया, दुंद्या. बायकांचीं:- बाळकी, मुढी, नामी, धाकली काळी, इ. (वि. विस्तार पु. ४३. अं.९)
जा त पं चा यं त - सर्व जातीची एक पंचायत नाहीं ग्रामपंचायती असून शिवाय तर्फ पंचायती आहेत; विशेष प्रसंगीं जवळजवळच्या दोन अगर दोहोंपेक्षां जास्त तर्फांची पंचायत भरविण्याची वहिवाट आहे. कांहीं ठिकाणीं पंचायतींचा अध्यक्ष  निवडला जातो व कांहीं ठिकाणीं तो वंशपरंपरेनें चालत आलेला असतो. तथापि न्यायाचा निवाड पंचांच्या संमतीनें केला जातो. सर्वसाधारण अशीं जातीचा देवळें नाहींत; तरी पण प्रत्येक गांवांत गांवकीच्या (ज्ञातिगृहस्थांच्या) मालकीचीं अगर कांहीं विशेष व्यक्तींनीं स्वखर्चानें बांधलेलीं व त्यांच्या मालकीचीं अशीं देवळें आहेत. कांहींनां सरकारी वेतनें आहेत, कांहींची व्यवस्था वर्गणीनें होते आणि कांहींची व्यवस्था स्वतः मालकाकडून होते. चाळी, घरें, जमीन-जुमला वगैरे मालमत्ता मुळींच नाहीं.
जातीचा कर नाहीं, परंतु लग्नाच्या वेळीं गांवाचा हक्क म्हणून ठराविक रक्कम वसूल करण्यांत येते. तिच्यावर ज्ञातिगृहस्थांचा हक्क असतो.
पंचायतीचे निवाडे लिहून ठेवण्याची पद्धति नाहीं. अलीकडे कांहीं ठिकाणीं सुमारें २५ वर्षें निवाडे लिहून ठेवण्याची पद्धति सुरू झाली आहे. पंचायतीचे निकाल अमलांत आणण्याचे बाबतींत भोजनखर्च घेण्याचें व मानपानादि वहिवाट बंद करण्याचें जातीच्या स्वाधीन आहे. पूर्वापार वहिवाटीनें शासन करण्याचा अधिकार चालू आहे परंतु अशा प्रकारच्या अधिकाराचा प्रश्न अद्याप सरकारी कोर्टांत उपस्थित झालेला नाहीं.
पंचायतीपुढें नित्य येणारे प्रश्न म्हटले म्हणजे शिवागाळ अब्रूनुकसानी व शेतभात, गुरेंढोरें वगैरे आगळीकसंबंधीं होत; आणि महत्त्वाचे नैमित्तिक प्रश्न म्हटले म्हणजे जातीच्या व धर्माच्या नियमांविरुद्ध केलेल्या कृत्यांविषयीं होत.
माळी, भंडारी, मराठे, कोळी आणि तिलोरी कुणबी ह्या जाती आगरीशीं सदृश असून भिन्न आहेत. अन्नोदक व्यवहार फक्त ब्राह्मणजातीबरोबर चालतो. जातींत पोटजाती नाहींत. चितपावन, गोवर्धन आणि पळशे जातीचे भिक्षुक यांचे विवाहादि संस्कार करितात. जातीचे बहुतेक सर्व प्रश्न जातच. सोडविते; मात्र क्वचित् महत्त्वाच्या धार्मिक प्रश्नांवर ब्राह्मणांचे मत घेण्यांत येतें.
गेल्या तीनचारशें वर्षांत जातीचें स्थलांतर मुळींच झालें  नाहीं. इंग्रजी राज्यापूर्वीं जातीचा आचार चालीरीतींस अनुसरून होता असें ज्ञातीच्या मंडळींचे म्हणणें आहे. त्यानंतर काहीं बाबतींत सुधारणेंच्या दृष्टीनें फरक पडत चालला आहे.
जातीत पुनर्विवाह रूढ असून विधवांची व निराश्रित मुलांची सोय केलेली नाहीं. जातींतील पुनर्विवाहाच्या पद्धतीमुळें स्त्रियांशीं अधर्मव्यवहारानें संतति झाल्याचीं उदाहरणें घडत नाहींत असें ज्ञातिसभा म्हणते.
(सं द र्भ ग्रं थ – बाँ. गॅ. पु.१३, भा. १. सेन्सन रिपोर्ट १९११, पु. ७. आगरी-ज्ञाति- परिषदेच्या सेक्रेटरीकडून व आगळे-ज्ञातिहितवर्धक मंडळाच्या अध्यक्षाकडून आलेली माहिती ( ज्ञानकोशकारांनीं सर्व जातींनां आपआपली माहिती सविस्तर पुरविण्याविषयी विनंती केली होती तदनुसार या ज्ञातीनें आपल्या सभा भरवून एकमतानें जी माहिती पाठविली तिचा येथें उपयोग केला आहे ). आगळे ज्ञातीच्या वद्दिवाटीचे नियम. वि. विस्तार पु. ४३. टॅन्झॅक्शन्स बॉ. जिऑ. सोसायटी.१९४.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा