तुळजापूरची तुळजाभवानी |
तुळजापूरची तुळजाभवानी |
तुळजापूरची तुळजाभवानी |
महाराष्ट्राची शक्तीदायिनी अशी जिची ख्याती ती आदिशक्ती तुळजाभवानी! शिवाजी महाराजांचे प्रेरणास्थान! अशा या तुळजाभवानीचे ठिकाण असलेले तुळजापूर म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रासाठी पुजनीय. तुळजापूर हे गाव उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. तुळजाभवानीचे मंदिर बालाघाट डोंगराच्या एका पठारावर बांधण्यात आले आहे. तुळजा या शब्दाचा मूळ अर्थ 'तात्काळ मदतीला येणारी' असा सांगतात. तुळजा हे त्वरजा या शब्दाचा अपभ्रंश आहे, असेही सांगितले आहे.
या देवीच्या उत्पत्तीमागे अशी कथा सांगितली जाते की, कृतयुगामध्ये या भागात कर्दम ऋषींचा आश्रम होता. त्यांची पत्नी होती अनुभूती. कर्दम ऋषींच्या मृत्यूनंतर अनुभूतीला सहगमन करायचे होते. पण ती त्यावेळी गर्भवती असल्याने तिला तसे करता आले नाही. म्हणून तिने मुलगा मोठा होऊन गुरुगृही गेल्यानंतर देवीच्या तपश्चर्येला प्रारंभ केला. या तपश्चर्येच्या काळात कुकूर नावाच्या राक्षसाची नजर अनुभूतीवर पडली. त्या राक्षसापासून स्वत:ला वाचविण्यासाठी तिने देवीची प्रार्थना केली आणि अष्टभूजेच्या रुपात देवीने प्रगट होऊन तिचे रक्षण केले. तिथेच देवीने वास्तव्य केले. हेच ठिकाण तुळजापूर नावाने पुढे प्रसिध्द झाले.
या मंदिरात जाण्यासाठी दोन टप्प्यांमध्ये ९० पायर्या चढाव्या लागतात. काही पायर्या चढून गेले की इथे एक कल्लोळ तीर्थ नावाचं कुंड दिसतं. सर्व तीर्थांना इथे प्रगट व्हायचे होते आणि त्यांनी एकच कल्लोळ केला, असं म्हणतात. म्हणून या तीर्थाचे नाव कल्लोळ तीर्थ पडले आहे. त्यानंतर भेटतं ते गोमुख तीर्थ. याशिवाय इथे गणेश तीर्थ, अमृतकुंड हे कुंडही आहेत. याशिवाय मंदिराकडे जाताना विठ्ठल, दत्तात्रय, सिध्दीविनायक यांची मंदिरे लागतात.
मुख्य मंदिराभोवती मोठे प्रांगण आहे आणि आजुबाजूला प्रशस्त ओवर्या आहेत. मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे. या मंदिरावर हत्ती, घोडे, मोर, यश, गंधर्व, किन्नर यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या प्रांगणामध्ये दोन मोठ्या दीपमाळा आहेत. त्यांचे बांधकाम शिवाजी महाराजांनी केले आहे, असे म्हणतात. देवीच्या मंदिरासमोर भवानीशंकराचे मंदिर आहे. या मंदिरात स्फटिकाचा एक सिंह आहे. हा सिंह हे देवीचे वाहन आहे. तुळजाभवानीची मूर्ती ही अष्टभूजा असून तिने बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र आणि राक्षसाची शेंडी धारण केली आहे. पाठीवर बाणाचा भाता धारण केला आहे. युध्दाच्या तयारीत असलेल्या या अष्टभूजेचे हे रौद्र रुप तरीही विलोभणीय आहे.
या मंदिरात देवीची चार वेळा पूजा केली जाते. याशिवाय देवीचे नवरात्र हा सर्वात मोठा उत्सव असतो. याशिवाय गुढीपाडवा, ललितापंचमी, बलिप्रतिपदा, मकरसंक्रांत, शिलाष्टमी आणि रथसप्तमी या दिवशी देवीची महापूजा असते.
या देवीने रामाला लंकेचा रस्ता दाखवला म्हणून तिला रामवरदायिनी असे म्हणतात. रामाला दिशादर्शन करणारी, शिवाजी महाराजांना आणि अख्ख्या महाराष्ट्राला प्रेरणा देणारी ही तुळजाभवानी आहे. म्हणूनच ती महाराष्ट्राचे कुलदैवत आहे.
जय जय अष्टभूजा नारायणी हो !
दुर्गा, भवानी, तुळजा, तुझी तुळजापुरी देखीली हो!
असे म्हणताना त्यामुळे प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाचे मस्तक नमते आणि बाहू स्फुरतात ते यामुळेच!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा